Friday 12 February 2016

चांगदेवपासष्टी : पद्यरूपांतर


संत ज्ञानेश्वरांनी श्री चांगदेवांना उद्देशून लिहिलेले पासष्ट ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेवपासष्टी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे गीतेचा अर्थ-विस्तार आहे तर चांगदेवपासष्टी म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन असलेल्या ‘अमृतानुभव’ या ग्रंथाचा अर्करूप सारांश..!
*


स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनी जगदाभासु

दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥


स्वस्ति श्री वटेश,  जो दावी सर्वांस
जगताचा भास  लपुनिया ।
तोच मग स्वये  करून निरास
आत्मस्वरूपास  प्रकटवी ॥१॥
*

प्रगटे तंव तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥२॥

प्रकटता तत्त्व  जग दिसेनासे
पुन्हा दिसलेसे  लपे तेव्हा ।
प्रकट ना लुप्त  उणे न अधिक
ते निरुपाधिक  असे सदा ॥२॥
*

बहु जंव जंव होये । तंव तंव कांहीच न होये
काहीं नहोनिं आहे । अवघाचि जो ॥३॥

अनेक रूपात  प्रकटत राही
तरी नवे काही  झाले काय? ।
राही अबाधित  रूपे लेऊनही
न होऊन काही  तेची सर्व ॥३॥
*

सोनें सोनेंपणा उणें । न येताची झालें लेणें ।
तेंवी न वेंचतां जग होणें । अंगे जया ॥४॥

काहीच न होते  सोन्यामध्ये उणे
जरी होय लेणे  सोनेच ते ।
तैसे जग होणे  न होता विकार
दिसे निराकार  आकारात ॥४॥
*

कल्लोळकंचुक । न फेडिता उघडें उदक ।
तेंवी जगेंशी सम्यक्‍ । स्वरूप जो ॥५॥

कल्लोळांची वस्त्रे  अंगी लेऊनही
उघडे प्रवाही  वाहे पाणी ।
तसे नाम-रूप  करून धारण
राहते आपण  स्वरूपात ॥५॥
*

परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां ।
तेंवी विश्वस्फूर्ति इयां । झांकवेना जो ॥६॥

किती परमाणू  पृथ्वितत्त्व एक
रूपात अनेक  लपते ना ।
तशी विश्वस्फूर्ती  प्रकाशते जरी
झाकते ना तरी  आत्मतत्त्व ॥६॥
*

कळांचेनि पांघुरणे । चंद्रमा हरपों नेणें ।
कां वन्ही दीपपणे । आन नोहे ॥७॥

चंद्र हरवेना  चंद्रकलांमुळे
अग्नी दिव्यामुळे  वेगळा ना ॥७॥
*

म्हणोनि अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्ट्टत्व वर्ते ।
तें मी नेणें आईतें । ऐसेंचि असे ॥८॥

दृश्य आणि द्रष्टा  असती वेगळे
अविद्येच्या मुळे  वाटतसे ।
असो अशी मते  ते मी काही नेणे
एकत्वच जाणे  आयते जे ॥८॥
*

जेंवी नाममात्र लुगडें । येर्‍हवीं सुतचि तें उघडें ।
कां माती मृद्भांडें । जयापरी ॥९॥

वस्त्रे वेगळाली  नाममात्र रूप
सूत हे स्वरूप  अंतर्बाह्य ।
किंवा घटादिक  अनेक दिसती
सार्‍यामधे माती  एक असे ॥९॥
*

तेंवी द्रष्टा दृश्य दशे । अतीत दृड्‍.मात्र जें असे ।
तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥१०॥

तशाच दृश्यादि  दशा वेगळाल्या
वाटती निराळ्या  ऐक्य जरी ।
दृश्य द्रष्ट्यावीण  असे जे अतीत
तेच त्रिपुटीत  दृश्यमान ॥१०॥
*

अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें ।
नाना अवयव संभ्रमें । अवयविया जेंवी ॥११॥

दागिने हे नाम  दागिन्यात सोने
सोनेच दागिने  भिन्न भिन्न ।
जशी वेगळाली  दिसती इंद्रिये
वसे त्यांच्यारूपे  देह एक ॥११॥
*

तेंवी शिवोनि पृथ्वीवरी । भासती पदार्थांचिया परी ।
प्रकाशे तें एकसरी । संवित्ति हे ॥१२॥

तशा असंख्यात  पदार्थांच्या परी
भासतात जरी  सर्वठायी ।
आत्मतत्त्व एक  सर्वत्र असते
तेच प्रकाशते  चहूकडे ॥१२॥
*

नाहीं ते चित्र दाविती । परि असे केवळ भिंती ।
प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ॥१३॥

भित्तिचित्रे सारी  दाविती, जे नाही
त्यांच्यामागे पाही  नित्य भिंत ।
तसे सारे जग  जरी प्रकाशते
फक्त विलसते  आत्मतत्त्व ॥१३॥
*

बांधयाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाची गोडी ।
तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण ॥१४॥

ढेपेस असते  गुळाचीच गोडी
सत्वास न मोडी  आकाराने ।
तसे आत्मतत्त्व  जरी प्रकटते
बाधीत न होते  रूपांमुळे ॥१४॥
*

घडियेचेनि आकारें । प्रकाशिजे जेंवी अंबरे ।
तेंवी विश्वस्फूर्ति स्फुरें । स्फूर्तिचि हे ॥१५॥

घडीच्या रूपाने  वस्त्र विलसते
विश्वरूपांमधे  स्फूर्ती तशी ॥१५॥
*

न लिंपतां सुखदु:ख । येणे आकारें क्षोभोनि नावेक ।
होय आपणिया सन्मुख । आपणचि जो ॥१६॥

जरी आकारात  होई भासमान
सुख-दुःखापार  राहतसे ।
अलिप्तपणाने  होऊन अनेक
आपणासन्मुख  राही सदा ॥१६॥
*

तया नांव दृश्याचें होणें । संवित्ति द्रष्ट्टत्वा आणिजे तेणें ।
बिंबा बिंबत्व जालेपणें । प्रतिबिंबाचेनि ॥१७॥

तया नाव दृश्य  द्रष्टत्व जे देते
तरी एकत्व ते  नित्य असे ।
प्रतिबिंबामुळे  बिंबाला मिळते
बिंबत्व, जरी ते  एकलेच ॥१७॥
*

तेंवी आपणचि आपुला पोटी । आपणया दृश्य दावित उठी ।
द्रष्टादृश्यदर्शन त्रिपुटी । मांडे तें हे ॥१८॥

तसे आपणची  द्रष्टा होऊनिया
आपल्याच दृश्या  पाहते ते ।
निर्मुनिया दृश्य,  द्रष्टत्व, दर्शन
त्रिपुटी मांडून  खेळतसे ॥१८॥
*

सुताचिये गुंजे । आंतबाहेर नाही दुजें ।
तेंवी तिनपणेंविण जाणिजे । त्रिपुटि हे ॥१९॥

सुताच्या लडीत  अंतर्बाह्य सूत
तसे त्रिपुटीत  तेच असे ।
तीनपणाविना  आपण आपले
राहते एकले  आपल्यात ॥१९॥
*

नुसधें मुख जैसे । देखिजतसें दर्पणमिसें ।
वायांचि देखणें ऐसें । गमों लागे ॥२०॥

आपलेच मुख  दर्पणी दिसते
द्रष्टत्व लटिके  नाही काय? ॥२०॥
*

तैसें न वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा ।
हेंचि जाणे प्रसिद्धा । उपपत्ति इया ॥२१॥

तसे आत्मतत्त्व  अभेदी राहते
तरी ते वाटते  तीनपणे ।
भेदातीत तत्त्व  जाणण्याची युक्ती
सांगे उपपत्ती  जाण ती तू ॥२१॥
*

दृश्याचा जो उभारा । तेंचि द्रष्ट्टत्व होय संसारा ।
या दोहींमाजिला अंतरा । दृष्टी पंगु होय ॥२२॥

दृश्याचा पसारा  त्यामुळे द्रष्टत्व
दोहोमुळे जग  चालतसे ।
पण दोन्हीमधे  अंतर पाहता
दृष्टीला पंगुता  येऊ लागे ॥२२॥
*

दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्टि घेऊनि असे काई ? ।
आणि दृश्येंविण कांही । द्रष्टत्व असे ? ॥२३॥

दृश्य नसे जर  पाहणे ते काय?
द्रष्टत्वही जाय  दृश्यामागे ॥२३॥
*

म्हणोनि दृश्याचें जालेपणें । दृष्टि द्रष्ट्टत्व होणें ।
पुढती तें गेलिया जाणें । तैसेचि दोन्ही ॥२४॥

दृश्य असे तर  द्रष्टत्व असेल
जर ते नसेल  राहे काय? ॥२४॥
*

एवं एकचि झालीं ती होती । तिन्ही गेलिया एकचि व्यक्ती ।
तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥२५॥

एकातून तीन  तिन्ही जाता एक
साच एकपण  तीन भ्रांती ॥२५॥
*

दर्पणाच्या आधि शेखीं । मुख असतचि असे मुखीं ।
माजीं दर्पण अवलोकीं । आन कांहीं होय ? ॥२६॥

आरसा समोर  असेल नसेल
मुखाजागी मुख  असते ना?
पाहता त्याच्यात  दिसे प्रतिबिंब
मुळातले बिंब  बदले का?॥२६॥
*

पुढें देखिजे तेणें बगें । देखतें ऐसें गमों लागे ।
परी दृष्टीतें वाउगें । झकवित असे ॥२७॥

समोर दिसता  प्रतिबिंब साच
पाहतो असेच  वाटू लागे ।
पाहणारा पाही  आभास दृश्याचा
दृष्टीला चकवा  फुकाचाच ॥२७॥
*

म्हणोनि दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्टत्वावेगळें ।
वस्तुमात्र निहाळे । आपणापाशीं ॥२८॥

म्हणून जाणावे  दृश्याचिये वेळे
दर्शन निराळे  काय आहे?
स्वतः आत्मतत्त्व  दृश्य, द्रष्टा होते
आपण पाहते  आपणाला ॥२८॥
*

वाद्यजातेंविण ध्वनी । काष्ठजातेंविण वन्ही ।
तैसें विशेष ग्रासुनी । स्वयेंचि असे ॥२९॥

वाद्ये नसताही  असतोच ध्वनी
असतोच वन्ही  काष्ठावीण ।
तैसे ‘विशेषां’चे  असो नसो जग
आत्मतत्त्व एक  असतेच ॥२९॥
*

जें म्हणतां नये कांहीं । जाणो नये कैसेंही ।
असतचि असे पाही । असणें जया ॥३०॥

‘असणे’ शब्दात  वर्णताच न ये
जाणताही न ये  कशानेही ।
अनिर्वचनीय  असे ते ‘असणे’
जरी अज्ञेय ते  ‘असे’ नित्य ॥३०॥
*

आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा ।
तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥३१॥

डोळ्यांमधे दृष्टी  असते तरीही
डोळा तिला काही  दिसेल का?
ज्ञानी ज्ञानरूप  तसाच दुबळा
ज्ञेय तो स्वतःला  होईल का?॥३१॥
*

जें जाणणेंचि कीं ठाईं । नेणणें कीर नाहीं ।
परी जाणणें म्हणोनियांही । जाणणें कैंचे ! ॥३२॥

संपूर्ण असणे  केवळ जाणीव
नाहीच नेणीव  खरोखर ।
ज्ञान-स्वरूपात  वेगळेपणाने
जाणाया जाणणे  असेल का?॥३२॥
*

यालागीं मौनेंचि बोलिजे । कांही नहोनि सर्व होईजे ।
नव्हतां लाहिजे । कांहींच नाहीं ॥३३॥

म्हणून मौनात  राहून बोलावे
न होऊन व्हावे  सर्व काही ।
न होता विशेष  आपुल्याच ठायी
प्राप्त कर काही  निर्विशेष ॥३३॥
*

नाना बोधाचिये सोयरिके । साचपण जेणें एके ।
नाना कल्लोळमाळिके । पाणी जेंवि ॥३४॥

असंख्य कल्लोळ  त्यात पाणी एक
होऊन अनेक  वाहतसे ।
तशा उपपत्ती  अनेक बोधांच्या
ज्ञान एक त्याच्या  पार आहे ॥३४॥
*

जें देखिजतेविण । एकलें देखतेंपण ।
हें असो आपणीया आपण । आपणचि जें ॥३५॥

पाहणे एकले  दृश्य-विश्वावीण
आपले आपण  आपणात ।
दृश्य ना दर्शन  कोठे द्रष्टेपण
त्रिपुटीची खूण  लोपलेली ॥३५॥
*

जे कोणाचे नव्हतेनि असणें । जे कोणाचे नव्हतां दिसणें ।
कोणाचे नव्हतां भोगणें । केवल जो ॥३६॥

संबंधांशिवाय  स्वतःत असणे
तसेच दिसणे  न होताही ।
भोग्य भोक्त्यावीण  अखंड भोगणे
एकत्वी राहणे  निरंतर ॥३६॥
*

तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा ।
चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥३७॥

असशी तू पुत्र  वट-ईश्वराचा
रवा कापुराचा  असे जसा ।
चांगदेवा तसे  तू-मी नाही द्वैत
एकत्व दोघात  ऐक कसे ॥३७॥
*

ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणें ।
ते तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि ॥३८॥

संवादात घडे  बोलणे ऐकणे
दोन्ही एक, म्हणे  ज्ञानदेव ।
जसा तळहात  तळहाता तळी
देऊ पाहे मिठी  तसेच हे ॥३८॥
*

बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे ।
कां उजिवडे देखिजे । उजिडा जेंवी ॥३९॥

आपलाच ध्वनी  ऐकावा बोलाने
चाखावे स्वादाने  स्वादालाच ।
किंवा उजेडाने  यावे उजेडात
स्वतःच पहावे  उजेडाला ॥३९॥
*

सोनिया वरकल सोनें जैसा । कां मुख मुखा हो आरिसा ।
मज तुज संवाद तैसा । चक्रपाणि ॥४०॥

मुखापुढे जसा  मुखाचा आरसा
कसोटी सोन्याला  सोन्याचीच ।
तसा चांगदेवा  आपुला संवाद
आहे कुठे भेद  दोघामधे?॥४०॥
*

गोडिये आपली गोडी । घेतां काय न माये तोंडीं ।
आम्हा परस्परें आवडी । तो पाडु असे ॥४१॥

आपुलीच गोडी  जर चाखायाची
गोडीला जिभेची  सोय हवी ।
तसाच आपला  जाणाया जिव्हाळा
द्वैताचा उमाळा  लागेल ना?॥४१॥
*

सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे ।
कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥४२॥

भेटीसाठी जीव  उल्हसतो पण
तू, मी असे दोन  आहे कुठे?।
बिघडेल काय  ‘सिद्ध-भेट’भाव
भेटीचा विचार  भिववितो ॥४२॥
*

घेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येवों पाहे मन ।
तेथे दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥४३॥

घ्यावया दर्शन  मन प्रकटेल
तेव्हा मावळेल  नित्य-भेट ।
अशा विचाराचा  येता अडसर
दर्शन अशक्य  वाटू लागे ॥४३॥
*

कांहीं तरी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी ।
ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेति उमसू ॥४४॥

मग ते बोलणे,  करणे, कल्पणे
किंवा नाकारणे  शक्य काय?।
शक्य होते दोन्ही  वेगळेपणात
अद्वैत स्थितीत  होणे नाही ॥४४॥
*

चांगया ! तुझेनि नांवें । करणें न करणें न व्हावें ।
हे काय म्हणों परि न धरवें । मीपण हें ॥४५॥

वेगळेपणाने  करावया काही
माझे ‘मी’पणही  धरवेना ।
चांगदेवा तेथ  वेगळे ‘तू’पण
धरावे कुठून  अद्वैतात? ॥४५॥
*

लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो ।
तंव तेंचि नाहीं मा काय घेवो । माप जळा ॥४६॥

लवण पाण्यास  मोजण्या निघाले
मिळूनिया गेले  पाण्यामधे ।
मोजावया पाणी  तेच ना उरले
स्वतः पाणी झाले  मोजे कोण?॥४६॥
*

तैसें तुज आत्मयातें पाही । देखो गेलिया मीचि नाहीं ।
तेथें तूं कैचा काई । कल्पावया जोगा ॥४७॥

तसे तुझ्या ठायी  स्वरूप पाहता
‘मी’पणाच माझा  उरला ना ।
स्वरूपावेगळे  तुझे रूप मग
‘तू’ म्हणून सांग  काय कल्पू?॥४७॥
*

जो जागोनि निद देखे । तो देखणेपणा जेंवि मुके ।
तेंवि तूंतें देखोनि मी ठाके । कांही नहोनि ॥४८॥

जाग आल्यावर  निद्रा न दिसते
द्रष्टत्वही जाते  तिच्यासवे ।
तसे तुझ्या भेटी  होतो मी विलीन
राहे भेदावीण  केवल मी ॥४८॥
*

आंधाराचे ठायीं । सूर्यप्रकाश तंव नाहीं ।
परी मी आहें हें कांहीं । न वचेचि जेंवि ॥४९॥

अंधाराचे ठायी  प्रकाश नसतो
दृश्या लपवतो  आपणात ।
काही न दिसते  दृश्य जग, देह
‘आहे मी’ जाणीव  उरे फक्त ॥४९॥
*

तेंवी तूंते मी गिंवसी । तेथें तूंपण मीपणेंसी ।
उखते पडे ग्रासीं । भेटीचि उरे ॥५०॥

तसा तुझ्यामध्ये  मला मी मिळालो
मी, तू मावळलो  आपोआप ।
तू, मी या उपाधी  होताच विलीन
उरलो आपण  स्वरूपात ॥५०॥
*

डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें ।
आणि तेणेंचि तो देखे । न डंडळिता ॥५१॥

डोळ्याच्या ठिकाणी  डोळ्याचेच चित्र
बनतसे दृश्य  स्वये डोळा ।
आणि पाहण्याचे  साधनही तोच
पाहतो त्यानेच  अनायासे ॥५१॥
*

तैसी उपजतां गोष्टी । न फुटतां दृष्टी ।
मीतूंवीण भेटी । माझी तुझी ॥५२॥

तसा हा संवाद  ‘मी-तू’पणाविण
एकत्वाची खूण  लोपते ना ।
दृश्य तोच द्रष्टा  द्रष्टा तेच दृश्य
क्रियेविण भेट  तुझी माझी ॥५२॥
*

आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी ।
ते भोगिली अनुवादी । घोळघोळू ॥५३॥

गळून उपाधी  अद्वयची झालो
आपण नुरलो  वेगळाले ।
अशा या भेटीचा  करू अनुवाद
भोगूया आनंद  पुन्हा पुन्हा ॥५३॥
*

रुचतियाचेनि मिसें । रूचितें जेविजे जैसें ।
कां दर्पणव्याजें दिसे । देखतें जेंवि ॥५४॥

भोक्त्याच्या निमित्ते  रुचीच जेवते
रुची आस्वादते  रुचिलाच ।
निमित्त केवळ  आरशाचे होई
पाहणारा पाही  पाहत्याला ॥५४॥
*

तैसी अप्रमेयें प्रमेयें भरलीं । मौनाचीं अक्षरें भलीं ।
रचोनि गोष्टी केली । मेळियेचि ॥५५॥

तसे प्रमेयांच्या  पल्याड जे आहे
त्याला मोजियले  प्रमेयांनी ।
त्यांत जडवून  अक्षरे मौनाची
खूण एकत्वाची  दखविली ॥५५॥
*

इये करूनि व्याज । तूं आपणयातें बुझ ।
दीप दीपपणें पाहे निज । आपुलें जैसें ॥५६॥

आता या मौनात  स्वरूप तू जाण
झाकलेले ज्ञान  उघडून ।
स्वयंप्रकाशात  होऊनिया दीप
पाही निजरूप  दीप जसा ॥५६॥
*

तैसी केलिया गोठी । तया उघडिजे दृष्टी ।
आपणिया आपण भेटी । आपणामाजीं ॥५७॥

उघडून आत  तशी ज्ञानदृष्टी
सांगितल्या गोष्टी  अनुभवी ।
स्वरूपबोधाने  आपणच घेई
आपुल्याच भेटी  आपणात ॥५७॥
*

जालिया प्रळयीं एकार्णव । अपार पाणियाची धांव ।
गिळी आपुला उगव । तैसें करी ॥५८॥

प्रलयाचे पाणी  अपार धावते
सागरच होते  विश्व सारे ।
गिळून उगम  एकाकार होई
तैसे करी काही  चांगदेवा ॥५८॥
*

ज्ञानदेव म्हणे नामरूपें । विण तुझें साच आहे आपणपें ।
तें स्वानंदजीवनपे । सुखिया होई ॥५९॥

नाम-रूपाविण  असणे जे तुझे
तेच नित्य, म्हणे  ज्ञानदेव ।
स्वरूप-ज्ञान हे  दृढ व्हावे मनी
स्वानंदाचा धनी  व्हावेस तू ॥५९॥
*

चांगया पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ति ।
वेद्यवेदकत्वही अतीतीं । पदीं बैसें ॥६०॥

पुन्हा पुन्हा नीट  ऐक चांगदेवा
ज्ञान-धन घरा  आल्यावर ।
ज्ञेय-ज्ञात्यापार  अवस्थेचे पद
लाभेल निर्वेध  बैस तेथे ॥६०॥
*

चांगदेवा तुझेनि व्याजें । माउलिया श्रीनिवृत्तिराजें ।
स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें ॥६१॥

निवृत्तीनाथांनी  तुझ्या निमित्ताने
मज बोलविले  चांगदेवा ।
रसाळ पक्वान्न  आत्मानुभवाचे
अत्यंत प्रेमाने  दिले मज ॥६१॥
*
एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्हीं डोळस आरिसे ।
परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ! ॥६२॥

ज्ञानदेव आणि  चांगदेव ऐसे
डोळस आरसे  दोघेजण ।
परस्परांमधे  पाहता स्वरूप
दोघे आपोआप  मुकले भेदा ॥६२॥
*

तियेपरी जो इयां । दर्पण करील ओविया ।
तो आत्मा एवढिया । मिळेल सुखा ॥६३॥

तसा जो ओव्यांचे  आरसे करेल
स्वरूप दिसेल  त्याला त्यात ।
स्वरूप-बोधाचा  येता अनुभव
सुखाचे वैभव  प्राप्त होई ॥६३॥
*

नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसे तेंचि कैसें नेणों दिसें ।
असें तेंचि नेणों आपैसें । तें की होईजे ॥६४॥

नाहीच जे, काय  असेल ते नेणो
दिसे कैसे नेणो  दिसे तेही ।
नेणो काय आहे  केवल ते असे
आयते जे त्याचे  काय होणे?॥६४॥
*

निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें ।
केले तैसे गुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥६५॥

स्वरूप-निद्रा ती  निद्रेच्या अतीत
जागृती निद्रेत  जाग आणि ।
गिळून जागृती  जागे होण्यासाठी
दिली नवी दृष्टी  ज्ञानदेवे ॥६५॥
***

चांगदेवपासष्टी समाप्त

No comments:

Post a Comment