Tuesday, 24 May 2016

पसायदान


‘पसायदान’ ही संत ज्ञानेश्वरांनी केलेली एक श्रेष्ठतम अशी प्रार्थना आहे. गीतेवरील विस्तृत भाष्य असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या आठराव्या अध्यायात समारोप स्वरूपात ती आलेली आहे. त्यामुळे या प्रार्थनेची सुरुवात ‘आता’ अशी केलेली आहे. या प्रार्थनेचं वैशिष्ट्य हे की ती ईशस्वरूप विश्वात्मक देवाला संबोधून संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी केलेली आहे..!
पद्यरूपांतरामधे फक्त भावार्थ देण्याचा प्रयत्न आहे.
***

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्‍यज्ञें तोषावें
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥१७९३/१८

थोर गीताधर्म । साद्यंत कथिला
यथासांग झाला । शब्द-यज्ञ॥
विश्वात्मक देवा । प्रसन्न होऊन
द्यावे मज दान । हेची आता॥
*

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें॥१७९४/१८

कुटील बुद्धीचा । होऊदे विनाश
सत्कार्याची आस । लागो जीवां॥
सृष्टी नि माणसे, । सर्व प्राणिमात्र
यांच्यामध्ये मैत्र । उपजूदे॥
*

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात॥१७९५/१८

पापांचा अंधार । मावळून जावा
सूर्य उगवावा । स्वधर्माचा॥
चालतात जे जे । स्वधर्माच्या वाटे
त्यांना हवे ते ते । प्राप्त होवो॥
*

वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां॥१७९६/१८

ईश्वराचे भक्त । सार्‍या विश्वावर
करीती वर्षाव । मांगल्याचा॥
साधुसंत असे । सार्‍यांना भेटोत
निरंतर येथ । पृथ्वीवर॥
*

चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गांव
बोलते जे अर्णव । पीयूषाचे॥१७९७/१८

चालते बोलते । कल्पतरू आणि
गाव चिंतामणी । असती ते॥
बोलणे तयांचे । इतुके मधूर
जणू की सागर । अमृताचा॥
*

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु॥१७९८/१८

असती जे चंद्र । कलंकरहीत
सूर्य तापहीन । असती जे
संत सज्जन ते । सोयरे व्हावेत
नित्य लाभावेत । सकलांना
*

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित॥१७९९/१८

त्रैलोक्य सुखांनी । भरून राहावे
अखंड भजावे । ईश्वराला॥
*

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी॥१८००/१८

लौकिक जगी या । जगणेच ज्यांचे
ग्रंथमय झाले । अंतर्बाह्य
ईह-पर-लोक । दोन्ही स्तरांवर
विजयाचे घर । लाभो त्यांना
*

येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला॥१८०१/१८

लाभेल प्रसाद । म्हणे विश्वेश्वर
तेणे ज्ञानेश्वर । तृप्त झाला॥
***पद्यरूपांतर - आसावरी काकडे

Monday, 22 February 2016

ईशावास्य उपनिषद : पद्यरूपांतर


‘ईशावास्यम् इदं सर्वम् : एक आकलन-प्रवास’
या राजहंस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या पुस्तकात हे पद्यरूपांतर समाविष्ट केलेले आहे.

ईशावास्य : मंत्र १ ते ३

ईशावास्यम् इदं सर्वम् यत्किं च जगत्यां जगत्
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्वित् धनम् ॥१॥

ईशावास्य सारे  हे जे आहे ते ते । जग जगातले  ईशावास्य
म्हणून, त्यागून  भोगावे हे पण । दुसर्‍याचे धन  इच्छू नये ॥१॥

सत्ता = सत्‍ ता = असणे

ईश म्हणजे सत्ता  असण्याची मिती । ज्यामुळे निर्मिती  विश्वाची या
केवळ असणे  नाही रूप गुण । शून्य हीच खूण  सांगायला
पण विलक्षण  असे ही शून्यता । निर्मिती-क्षमता  वसे त्यात
व्यक्त ते सारेच  त्यात उपजते । नाहीसेही होते  त्याच्यामधे
उत्पत्ती-विनाश  अखंड प्रक्रिया । दृग्गोचर माया  होत असे
जन्मापासूनच  मृत्युच्या दिशेने । होई सूक्ष्मपणे  वाटचाल

प्रत्येक वस्तूही  प्रक्रिया-स्वरूप । पण भासे स्थीर  आहे असे
परिवर्तनाची  गतीच अशी की । कळणार नाही  इंद्रियांना
पृथ्वीचे भ्रमण  बीजाचे रूजणे । दृष्टी न पाहते  स्थूल-सूक्ष्म
असे सर्वकाही  म्हणजे हे जग । जगातले जग  गतिमान !
प्रत्येक अणू ही  जगाची आकृती । सूक्ष्म प्रतिकृती  संपूर्णाची

येणे जाणे इथे  अविरत चाले । सत्तेने व्यापले  सर्वकाही
सत्तेने राहावे  असेच हे सारे । किडा मुंगी तारे  आहे ते ते
असंख्य वस्तूत  सत्ताच प्रकटे । सत्ताच विनटे इथे तिथे
सत्‍तेविना काही  संभवत नाही । नाही असे काही  आहे काय?
काळाची मर्यादा  नाही असण्याला । अखंड विश्वाला  व्यापलेले

कालनिरपेक्ष  केवल असणे । कुठे काही उणे  नसतेच
आकळून असे  स्वरूप विश्वाचे । आयाम दृष्टीचे  बदलावे
दृश्याविषयीचे  जुने आकलन । समूळ त्यागून  नवे व्हावे  
शहाणे होऊन  उपभोग घ्यावा । संपूर्ण विश्वाचा  विश्वपणे
‘इतर’ ना कोणी  एक गोतावळा । छोटा ‘मी’ वेगळा  काढू नये

कोणाच्या धनाची  उरेल ना हाव । जाता दुजाभाव  विलयाला
‘मी’पण त्यागून  सारेच भोगावे । धन दुसर्‍याचे  आहे कुठे?
अनंत विश्वस्त  अनंत धनाचे । कुणाचे स्वतःचे  काहीच ना
प्रत्येकासंमुख  एक हिस्सा येतो । तोही बदलतो  अविरत  

प्रवासात नित्य  दृश्य बदलते । प्रवासीही नवे  दृश्यापुढे
‘सारेच अनित्य  म्हणून त्यागावे । सोडूनिया द्यावे  सर्वकाही’
‘किंवा, पुढे काय?  म्हणून हे सारे । भोगुनिया घ्यावे  याच देही’
अशा टोकांमधे  उभारावे घर । एकाचे अस्तर  दुसर्‍याला

सत्याचे स्वरूप  पुरेसे जाणून । त्यागासह भोग  घेत जावे
मला मिळते ते  माझेच ना फक्त । म्हणून आसक्त  होऊ नये
धरू नये हाव  कोणाच्या धनाची । त्यागाने भोगाची  होय सिद्धी
त्यागवृत्तीने या  करावे पालन । भरण-पोषण  जीवनाचे

त्यागाला करावे  भोगाचे साधन । यज्ञ हे निधान  दोन्हीसाठी
सृष्टी-चक्र नित्य  फिरत राहावे । ‘निर्मिती’चे व्हावे  समाधान
म्हणून यज्ञाचा  उपाय शोधला । विधी सांगितला  पूर्वजांनी
यज्ञ हवि घेतो  आणि फळ देतो । यज्ञ शिकवतो  कर्मकला
ज्याचे त्याला द्यावे  उरलेले घ्यावे । त्यागून भोगावे  तृप्तपणे

सकाम कर्मे नि  सर्व कर्मफले । त्यागायची, असे  जगताना
कर्म वाढवेल  आसक्ती धनाची । म्हणून त्यागाची  शिकवण
प्रत्येकच कृती  व्हावी यज्ञकर्म । जाणावे हे मर्म  शब्दांतले
जगणेच व्हावे  यज्ञ यथासांग । आयुष्य निःसंग  करणारा
ईशावास्य वृत्ती मुरवावी खोल । द्यावे नवे मोल आयुष्याला !
***


कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः ।
एवं त्वयी नान्यथेतोSस्ति न कर्म लिप्यते नरे ॥२॥


कर्मे करीतच  व्हावे शतायुषी । इच्छा ही मनाशी  धरायची ।
पर्याय ना काही  हाच मार्ग तुला । कर्म माणसाला  बांधते ना ॥२॥


नवे परिमाण  लाभता दृष्टीला । अर्थ जगण्याला  येई नवा
ईशावास्य सर्व  अशा या जगात । कर्मे करीतच  जगायचे
कर्म नाकारून  आयते भोगणे । होई लुबाडणे  दुसर्‍याला
अधिकार नाही  त्याला जगण्याचा । ओझे लादण्याचा  लोकांवर
निरंतर कर्मे  करीत राहून । राखावे इमान  जीवनाशी

कर्मे करीतच  व्हावे शतायुषी । इच्छा ही मनाशी  असू द्यावी
पण कर्मातच  नाही गुंतायचे । आसक्त व्हायचे  नाही कधी
निरासक्त कर्मे  करीत जगावे । आयुष्य भोगावे  तृप्तपणे
पर्यायही नाही  आणखी कोणता । ज्यामुळे मुक्तता  कर्मातही !

कर्म संकल्पना  अत्यंत व्यापक । कर्माविना क्षण  जात नाही
विश्वाची निर्मिती  कर्मामुळे होते  विलयाला जाते  तेही कर्म
सृष्टीच्या खेळाला  कर्माचे नियम  क्रीडा, क्रीडांगण  ईशावास्य

सारे स्वयंस्फूर्त  स्वतः सुसंगत  स्वतःचीच शिस्त  खेळामधे
स्थूल- सूक्ष्म सार्‍या  क्रिया, तीही कर्मे  निरंतर सवे  चालणारी
सुटकाच नाही  कर्मातून कोणा  नाही कर्माविना  अन्य मार्ग
सारे अस्तित्वच  आहे कर्मरूप  कर्म नाही तर  काही नाही

स्थल-कालबद्ध  अशा या विश्वात  क्रिया घडतात  अखंडीत
आतली ही ऊर्मी  तीही कर्मरूप  कर्माचे स्वरूप  सूक्ष्मतम
अनंत संबंध  खोल गुंतलेले  अविरत चाले  उलाढाल

एकातून दुजे  निपजे नवीन  आणखी त्यातून  घडे काही
भव्य गुंत्यातला  इवलासा कण  असतो आपण  नगण्यसा
साखळीमधला  एक दुवा फक्त  रांग चालवत  ठेवणारा !

कर्ता कोण इथे?  अकर्ताही कसा?  कर्माचा तो फासा  आहे कुठे?
पण माणसांच्या  जगातली नीती  बोलण्याची रीती  इहपर
वेगळीच सत्ता  इथल्या विश्वाची  व्याख्याही कर्माची  सांसारिक
इथल्या कर्मात  सगळी कर्तव्ये  दैनंदिन कामे,  देहधर्म
समाजधारणा  त्यासाठी नियम  सर्वांनी पालन  करायचे

निस्वार्थी मनाने  कामे केली तर  इथे आत्ता आज  क्लेषमुक्ती
पुढल्या जन्माची  कशाला काळजी  कर्तव्ये आजची  महत्त्वाची
जाणून हे सारे  जगावे सहज  ‘बंधना’चे भय  नको जीवा

कशाचे बंधन?  मुक्ती कशातून?  प्रश्न शब्दातून  उपजती
बंध-मुक्ती द्वंद्व  केवळ शब्दात  इथल्या जगात  माणसांच्या
अंतिम सत्तेच्या  स्तरावर नित्य  जरी द्वंद्वातीत  आहे सारे
सुख-दुःख आदि  द्वंद्वे असंख्यात  जगरहाटीत  फिरतात

सुखातून दुःख  दुःखातून सूख  सुखामागे दुःख  येई पुन्हा
अडकती पाय  असल्या गुंत्यात  आणि तेच नित्य  असे वाटे
म्हणावे बांधले  खांबाला धरून  तसे हे बंधन  कर्मातले
अशा बंधातून  कशी व्हावी मुक्ती  सांगतात युक्ती  जाणणारे !
***


असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृताः ।
ताँsस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥३॥

गाढ अंधाराने  सदा व्यापलेला  असुर्या नावाचा  लोक जेथ
असती असे जे  आत्मघाती जन  मेल्यावर तेथ  पोचतात ॥३॥


सारे मूढ जीव  दुर्लक्ष करीती  इथेच रमती  अज्ञानात
सारे वस्तूविश्व  प्रक्रियास्वरूप  पण याना स्थिर  वाटतसे
आणि हेच खरे  हेच चिरंजीव  पुरेल आजीव  वाटे यांना
त्यातच अखंड  आकंठ बुडून  दुःखे ओढवून  घेतात हे
अविरत सारे  बदलते आहे  पण करीती हे  डोळेझाक

दृश्यापल्याडचे  काही न दिसावे  वेगळे कळावे  काय यांना?
जाणकार कुणी  सांगतात ज्ञान  पण यांची मान  खालीच की !
फिरत राहती  स्वतःच्या चक्रात  स्वतःच्या मातीत  रुतलेले
आत्म-स्वरूपाची  ओळख ना याना  वरल्याच ज्ञाना  भुलती हे
असे हे सगळे  आत्मघाती जन  जिवंत मरण  भोगतात
‘असे’ मेल्यावर  होऊनिया प्रेत  असुर्य लोकात  पोचतात !

कोण हे असुर्य  कोणता हा लोक  सांगण्याचा रोख  काय आहे?
जन्म-मृत्यु नित्य  असे हेच जग  असते असुर्य  द्वंद्वात्मक
नरक, स्वर्गदि  असे सप्तलोक  काही सांगण्यास  कल्पिलेले
जपावया हीत  व्यक्ती, समाजाचे  फळ केलेल्याचे  सांगितले

सांगती त्याकडे  फिरवून पाठ  जीव जगतात  कसेतरी
स्वैराचारी सारे  स्वार्थांध होऊन  करती नरक  आयुष्याचा
स्वार्थाच्या खाईत  लोटती स्वतःला  नाही हव्यासाला  ताळतंत्र
जे जे मला मिळे  ते सारे माझेच  दुसर्‍याचे धन  तेही माझे
नाही मिळाले  की घ्यावे हिरावून  करुनिया खून  मारामारी

हेवेदावे भूक  संपतच नाही  स्वार्थाविना काही  सुचेचना
मूढ अंधारात  काही न दिसते  अज्ञान ग्रासते  सर्वस्वाला
असे सारे काही  म्हणजे असुर्य  जेथे ज्ञानसूर्य  झाकलेला

असुर्य लोकाचे  निर्माते आपण  जे की निजखुण  विसरती
आणि कसेतरी  जगती तमात  स्वये आत्मघात  करूनिया
सत्याचे स्वरूप  कळावे म्हणून  पुढे तत्त्वज्ञान  सांगितले
***


ईशावास्य : मंत्र ४ ते ८

अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन पूर्वमर्षत् ।
तद्धावतो s न्यानत्येति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥४॥


एक ते अखंड  निष्कंप निश्चल  तरी मनाहून  वेगवान
सर्वाच्या आधीच  सर्वत्र पोचते  गाठता न येते  देवानाही
जागीच राहून  ओलांडते जग  ते आहे म्हणून  विश्व आहे ॥४॥


काय जाणायचे  ज्ञानप्रक्रियेत  त्याचाच संकेत  दिला इथे
अनिर्वचनीय  असेच ते आहे  तरी सांगितले  शब्दामधे
शब्दांच्या नावेत  बसून जायचे  आणि पोचायचे  अर्थापार
निष्कंप निश्चल  भेदांच्या पल्याड  एक ते अखंड  एकरूप
पण मनाहून  असे वेगवान  त्याची काही खूण  सापडेना

‘ते’ जे की आदिम  आधीच पोचते  गाठता न येते  देवांनाही !
देव म्हणजे की  सर्व जाणणार्‍या  ब्रह्मांडामधल्या  ज्ञानशक्ती
त्यांच्या मदतीने  म्हणे, प्रजापती  विश्वाची निर्मिती  करतसे
म्हणे असती ते  प्रजापती-पुत्र  आधीच सर्वत्र  असणारे
पण ‘ते’ त्यांच्याही  आधीपासूनच  नित्य असतेच  सर्वठायी

पिंडातील देव  ज्ञानेंद्रिय-शक्ती  विषयांच्या मिती  जाणणार्‍या
पण ‘ते’ असे की  ‘विषय’ ना होते  आधीच असते  इंद्रियांच्या
नित्य सर्वव्यापी  तिष्ठत असते  तरी ओलांडते  धावत्याला
गतिमान सारे  कक्षा विस्तारती  पण ‘ते’ पुढती  असे त्यांच्या
फिरे विश्वासवे  विश्वच होऊन  पण विश्वाहून  वेगळेही!

असे हे ‘असणे’  वर्णिताच न ये  जाणताही न ये  इंद्रियांना
उगाच राहून  विश्वरूप घेते  कार्य करविते  विश्वस्फूर्ती
सारे अंतरिक्ष  व्यापणारा प्राण  मातरिश्वा नाव  आहे त्याला
‘ते’ आहे म्हणून  मातरिश्वा प्राण  करतो धारण  मूलद्रव्य
त्यातूनच होई  विश्वाची निर्मिती  आणि कर्म-गती  चालू राही

कार्य-कारणादि  निसर्गनियम  ‘ते’ आहे म्हणून  चालातात
विश्वाला व्यापते  तरीही उरते  अलिप्त राहते  अव्यक्तात
जणू सदा सज्ज  रिक्त गर्भाशय  विश्वाला आशय  देत राही

हेच जाणायचे  ज्ञान-प्रक्रियेत  जरी ‘ते’ कक्षेत  येत नाही
नको ना कळूदे  काय आहे सत्य  सार्‍याच्या अतीत  काय आहे
एवढे खरे की  स्वरूप कळेल  ओळख होईल  अनित्याची
***


तदेजति तन्नैजति तद्‍ दूरे तद्वन्तिके ।
तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः ॥५॥


हालचाल करी  निष्कंप ‘ते’ आहे  जरी दूर आहे  जवळही
जे जे आहे त्याच्या  सगळ्याच्या आत  बाहेरही व्याप्त  तेच आहे ॥५॥


जन्माला येऊन  निघून जाणारे  जग हलणारे  ‘ते’च आहे
‘ते’च नित्यरूप  सार्‍याच्या अतीत  निष्कंप स्थितीत  आयतेच
सारे चराचर  त्याने व्यापलेसे  जरी लपलेसे  निराकार

काल, आज, उद्या  सदा सर्वकाळ  इतके जवळ  असते ते
इथे, तिथे, वर  खाली सर्वदिशी  इतके हाताशी  असते ते
अखंड काळाचा  वर्तमान क्षण  सन्निध असून  निसटतो

तसेच ते तत्त्व  सर्वत्र असून  बुद्धीच्या स्वाधीन  होत नाही!
                 धरू जाता जाते  दूर इतके की  नाहीच कुठेही  वाटतसे    
क्षणकाल कोणा  दिसलेसे झाले  त्यांनीही वर्णिले  ‘तद्‍दूरे

जवळ की दूर  आत की बाहेर  चलत् की स्थीर  कसे आहे?
पाहणारी दृष्टी  कशी नि कुठून  पाहते त्यावर  ठरे सर्व

हे जे सर्व आहे  अनुभवविश्व  त्याच्या आत ‘ते’च  वसतसे
अनुभवबाह्य  असे जे की सारे  तिथेही वसते  नित्यपणे
प्रत्येक वस्तूच्या  अंतरात असे  जगत अणूंचे  सूक्ष्मतम
उत्पत्ती विनाश  अणूंचा अखंड  ‘ते’ आहे म्हणून  घडतसे
वस्तूंच्या बाहेर  वस्तूंचे जगत  दिसे ओतप्रोत  भरलेले

त्याचाच विलास  असते हे जग  जगातले जग  तेही ‘ते’च
असे काही नाही  केवळ जे आत  केवळ बाहेर  काही नाही
पूर्ण एकरस  मधे न अंतर  ‘असणे’ सर्वत्र  व्यापलेले

तत्त्व ना वेगळे  एक निरंतर  आत नि बाहेर  अखंडित
बाहेरचे दृश्य  पाही जो आतला  नाहीच वेगळा  दृश्याविण
दृश्य आणि द्रष्टा   कुठे आहे भेद  सर्व एकसंध  एकरस!
***


यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति ।
सर्व भूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥६॥


आत्म्यातच सारी  पाहतो जो भूते  आणि भूतांमधे  पाही आत्मा
कधी तो कोणाला  नाही कंटाळत  नाहीच मानत  आप-पर ॥६॥


स्थीर, गतिमान  जवळ नि दूर  आत नि बाहेर  असणे जे
तेच ‘आत्मतत्त्व’  नावाने नांदते  जीव-रूप घेते  भिन्न भिन्न
सगुण-निर्गुण,
 व्यक्तरूप होणे-  केवल असणे  यांच्यामध्ये
जोडणारा पूल  असे आत्मतत्त्व  बने असंख्यात  भुतमात्रे

ते ते सर्व भूत  जे जे की जन्मते  विनाश पावते  निरंतर
असे सर्व काही  जाणतो पाहून  ‘जो’ हे सर्वनाम  आहे त्याला
आत्म्यातच सार्‍या  भूताना पाहतो  खूण ओळखतो  स्वरूपाची
आणि भूतांमध्ये  आत्म्याला पाहतो  निरंतर जो, तो  आत्मज्ञानी

अहंतेचा पारा  पाठीशी घालून  होतसे दर्पण  साक्षी जसा
स्वतःत संपूर्ण  विश्वाला पाहून  विश्वाला दर्पण  करतसे
मग स्वरूपच   दिसे सर्व ठायी  दुजेपण काही  राहते ना!

आपले असणे  एक प्रतिकृती  संपूर्ण विश्वाची  वाटे त्याला
माती वृक्ष प्राणी राग लोभ द्वेष  समुद्र आकाश... आपल्यात
आणि विश्वातल्या  विभुती आपण  मनी असे खूण  एकत्त्वाची 

मग तो कधीच
 शंका घेत नाही  घृणास्पद काही  नाही त्याला
सदा ज्ञानमग्न  आनंदात राही  कंटाळत नाही  कशालाही
जगणे ज्ञानाचा  होई अनुवाद  नुरे भेदाभेद  जगण्यात
***


यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैवाभुद्‍ विजानतः ।
तत्र को मोहः कः शोकः एकत्वम् अनुपश्यतः ॥७॥

जेव्हा जाणत्याचा  आत्मा होतो भूते  जे जे घडे ते ते  सर्व तोच
एकत्वाचा तेव्हा  नित्य अनुभव  मग काय मोह?  कुठे शोक? ॥७॥

आत्मज्ञानी होतो  असा एकरूप  सर्वत्र स्वरूप  दिसे त्याला
आपलाच आत्मा  असंख्य भूतात  झाला प्रकाशित  असे वाटे
वेगळे न कोणी  एक आत्मतत्त्व  विचरे सर्वत्र  जाणतो हे

क्षणिक हे नसे  ज्ञानाचे दर्शन  जपे ज्ञानखूण  निरंतर
अखंडित भाव  एकत्वाचा राही  त्याला मोह काही  असेल का?
सर्व जो आपण  त्याला काय हवे?  आणि काय नवे  नाही असे?
अशा जाणत्याची  बुद्धी कशानेही  ग्रासणार नाही  कधीसुद्धा

सर्व तोच, तिथे  काय हरवेल? शोक का करेल  ज्ञानी मग?
‘आत्मैव सर्वाणि’   येता ही प्रचीती  ईशावास्यवृत्ती  अवतरे
संकुचित ‘मी’चे  होई विसर्जन  ‘असणे’च पूर्ण  होई ज्ञाता
***


स पर्यगात् शुक्रम् अकायम् अव्रणम् अस्नाविरम् शुद्धम् अपापविद्धम् ।
कविर्मनीषी परिभूः स्वयंभूः याथातथ्यतः अर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः ॥८॥


पोचतो तिथे जे  तेजस्वी विदेही  ज्याला इजा काही  होत नाही
स्नायुविरहित  जे की नित्यशुद्ध  कधी पापविद्ध  होत नाही
आत्मज्ञानी होतो  कवी, क्रांतदर्शी  मनावर त्याची  चाले सत्ता
सर्वज्ञ, स्वयंभू  त्याने यथातथ्य  साधले सर्वार्थ  सर्वकाळ ॥८॥


आत्मा की आत्मज्ञ  कोणाचे वर्णन?  ‘तो’ हे सर्वनाम  कोणासाठी?
आहे कुठे भेद  दोन्ही एक झाले  स्व-रूप उरले  सर्वठायी  
सांगितले इथे  संपूर्ण अव्दैत  मनुष्यदेहात  नांदे कसे

आत्मज्ञ पाहतो  आत्मा सर्वांमधे  ‘सर्व’ आत्म्यामधे  दिसे त्याला
पाहता पाहता  आत्मरूप घेतो  सर्वकाही होतो  आपणच
सगळ्या मार्गांनी  आत्म्याशी पोचतो  संपूर्ण व्यापतो  असणे जे

दीप्तीमान पूर्ण  सार्‍या सृष्टीरूपे  जरी प्रकाशते  निरंतर
बांधते न त्याला  कोणते शरीर  गतिमान स्थिर  दोन्ही असे
जखमी न होते  कोणत्या शस्त्राने  ‘विदेही’ कशाने  होई विद्ध?
स्नायूविरहित  सूक्ष्म देह सुद्धा  स्पर्शतो न त्याला  कोणेवेळी

अलिप्त, अस्पर्श  असे नित्यशुद्ध  कधी पापविद्ध  होत नाही
पुण्याचेही ओझे  नाही बाळगत  असे व्दंव्दातीत  सर्वकाळ!

असे आत्मतत्त्व  जाणतो तो कवी  दृश्यापार पाही  त्याची बुद्धी
वस्तूविश्वामधे  नाही अडकत  सारतत्त्व त्यात  दिसे त्याला
नित्य अनुभूती  असे एकत्वाची  मनावर त्याची  चाले सत्ता
स्व-तंत्र बुद्धीने  स्वाधीनच राही  वाहावत नाही  आवेगात
व्यक्त होऊनिया  वावरे देहात  जाणीव-रूपात  सर्वठायी!

तरी आत्ममग्न  स्वयंभू आयता  नांदतो स्वतः  स्वतःमधे
नवे काही नाही  करावे जे प्राप्त  शाश्वत सर्वार्थ  साधलेले
जरी स्वरूपात  झालेला विलीन  जगण्याची धून  तीही गातो!
वाट्याला आलेले  आयुष्य भोगतो  विषय जाणतो  यथातथ्य

काय आहे देह,  प्रकृती, विकार  अनित्य आकार  आयुष्याचे...
मनुष्य-रूपात  आत्माच वर्ततो  वाटा उचलतो  अस्तित्वाचा
जन्म-मृत्यु सारा   प्रकृतीचा खेळ  चिरंतन काळ   चाललासे

स्वयंभू असणे  विश्वाचा आधार  सगळे व्यापार  चालवते
त्याची प्रतिकृती  आत्म-स्वरूपात  छोटासा संसार  सांभाळते
सागराचा थेंब  सागर असतो  जरी तो खेळतो  लाटांवर
तसा आत्मज्ञानी  देहात विदेही  होऊनिया राही  ईशरूप!
 ***ईशावास्य : मंत्र ९ ते १४

अन्धं तमः प्रविशन्ति ये अविद्याम् उपासते
ततो भूय इव ते तमो य उ विद्यां रतः ॥९॥


जे कोणी भजती  अविद्येला नित्य  घोर अंधारात  जातात ते
त्याहूनही घोर  अंधारात जाती  विद्येच्या भजनी  लागती जे ॥९॥


नसतेच सोपे  आत्मज्ञानी होणे  एकत्व पाहणे  सोपे नाही
आयुष्याची व्हावी  दीर्घ तपश्चर्या  व्हावी दिनचर्या  यज्ञकर्म
समजून घ्यावे  मनुष्यत्व आधी  जगण्याला व्याधी  म्हणू नये

अविद्येने मिळे  व्यवहारी ज्ञान  भौतिक विज्ञान  असे त्यात
असे सर्व ज्ञान  पूर्ण मिळवावे  आयुष्य भोगावे  समृद्धीचे
पण सचोटीने  सर्व संपादावे  कर्तव्य करावे  नीतीपूर्ण

ज्याचे त्याला द्यावे  ऋणमुक्त व्हावे  त्यागून भोगावे  उरेल ते
अतिरिक्त हाव  नको भोगण्यात  रुतून देहात  राहू नये
फक्त भौतिकाची  कास जो धरतो  अंधारात जातो  अतृप्तीच्या

केवळ अविद्या  नाही हितकर  विद्येचा अधार  हवा तिला
अविद्येत व्हावा  विद्येचा आरंभ  मिळे आत्मज्ञान  जिच्यामुळे
पहावे जरासे  स्वतःच्या अल्याड  दृश्याच्या पल्याड  काय आहे
कोण मी? कुठून  देहामध्ये येतो  आणि कुठे जातो  मेल्यावर?

सारे वस्तूविश्व  सृष्टीचे वैविध्य  इथे उपलब्ध  झाले कसे?
चिरंजीव नाही  इथले काहीच  उत्पत्तीचा नाश  ठरलेला
तरी जे गुंतती  याच जगण्यात  देहाच्या विश्वात  ओतप्रोत
त्यांचा अधःपात  होतसे निश्चित  घोर अंधारात  जातात ते

पण म्हणून जे  कर्तव्ये इथली  लौकिकाच्या चुली  मोडतात
जगाला ते माया  देहाला नरक  कर्माला बंधन  मानतात
आणि अविद्येला  डावलून फक्त  विद्येतच नित्य  रमतात
त्यांना न मिळतो  जगण्याचा काठ  मोक्षाचाही घाट  दुरापास्त

अविद्येपासून  तुटलेली विद्या  कारण नाशाला  होत असे
होते अधांतरी  हरवून पाया  अविद्येची छाया  अव्हेरते
सृष्टीचे वैविध्य  व्यक्त ते ते सारे  नाकारत जाते  अव्यक्तात
अधिकच घोर  अंधारात नेते  अधोगती देते  ओंजळीत

अविद्या न जाणे  निर्मितीचा स्रोत  व्यक्त होते तेच  कळे तिला
व्यक्त ते सारेच  जन्मे अव्यक्तात  विनाशही त्यात  होत राही
अशा अव्यक्ताचे  ज्ञान हवे पण  मार्ग व्यक्तातून  जाई त्याचा
अनेकत्वामधे  जाणावे एकत्व  व्यक्तात अव्यक्त  जाणायचे
अनेकत्व पूर्ण  होई ओळखीचे  तेव्हा एकत्वाचे  कळे मर्म

अनेकत्वावीण  कशाचे एकत्व  अव्यकतच व्यक्त  होत राही
व्यक्ताची पायरी  गाळून अव्यक्त  जाणू पाहे भक्त  विद्येचा जो
पोचतो शून्यात  जे की निराधार  गाढ अंधःकार  असे जणू
असे विनाशक  केवळ अविद्या  पण फक्त विद्या  अधिकच!

आरंभाचे ज्ञान  होई शब्दातून  वेदान्ताची धून  त्याचसाठी
पण शब्द फक्त  आधाराची काठी  अनुभूतीसाठी  हाती घ्यावी
जगण्यात जेव्हा  उतरेल अर्थ  विद्येचे सामर्थ्य  होई सिद्ध
अनुभूतीवीना  व्यर्थ शब्दज्ञान  फुका दंभमान  वाढवेल
अविद्येहूनही  अधिकच खोल  गर्तेत नेईल  अहंकार
***


अन्यदेवाहुर्विद्यया अन्यत् आहुः अविद्यया
इति शुश्रुम धीराणां ये नस् तत् विचचक्षिरे॥१०॥


वेगळेच काही  कळे अविद्येने  वेगळे विद्येने  म्हणतात
घडविले आम्हा  ज्यांनी दर्शन  त्यांच्याचकडून  ऐकतो हे॥१०॥


अविद्या देतसे  जगण्याचे बळ  उगमाचे मूळ  दावी विद्या
ऐल तीरावर  आणेल अविद्या  पोचवेल विद्या  पैलतीरी

ग्रंथांचे वाचन  शक्य अविद्येने  आशय विद्येने  आकळेल
अविद्या करते  शरीर जतन  विद्येचे साधन  असते जे
एक देते अन्न  करण्या पोषण  ज्ञानाचे निधान  दुसरीत

अविद्येत असे  वेगळी प्रेरणा  विद्येची प्रेरणा  वेगळीच
वेगळेच फळ  मिळे अविद्येने  लाभते विद्येने  वेगळेच

ऐकतो हे आम्ही  सांगती जे संत  कुणी प्रज्ञावंत  पुन्हा पुन्हा
शब्दातीत असे  प्राचीन दर्शन  तेच शब्दातून  घडविती
स्पष्ट सांगतात  विशद करून  विवेकाचे ज्ञान  हाती देती!
***


विद्यां च अविद्यां च यस् तत् वेदोभयं सह
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते ॥११॥


विद्या नि अविद्या  दोन्ही एकत्रित  जाणूनिया हित  साधतो जो
अविद्येने मृत्यु  ओलांडून जाई  विद्येने मिळवी  अमृतत्त्व ॥११॥


भौतिक विज्ञान  आणि आत्मज्ञान  एकमेकावीण  अपुरेच
केवळ अविद्या  पोसते एकांग  विद्येने एकांग  विकसते
एकाच वेळेला  पाचही इंद्रिये  जाणतात जसे  विषयाला

तसा समन्वय  आहे अभिप्रेत  दोन्ही एकत्रित  साधायचे
‘आधी जगुयात  लौकिक जीवन  मग आत्मज्ञान  प्राप्त करू’
अशाने काहीच  नाही साधणार  न आर ना पार  धड काही

अविद्येला हवे  विद्येचे अस्तर  विद्येला आधार  अविद्येचा
अविद्येने जग  होता सुखकर  जगण्याचा पार  स्थिरावेल
मृत्युचे तांडव  संकटांची गस्त  येई आटोक्यात  सोसण्याच्या
विद्येने दृष्टीला  येता व्यापकता  मृत्यु भय चिंता  वाटेल का?
एकत्वाचे भान  आल्यावर मग  काही दुःखभोग  उरेल का?

होईल आश्वस्त  इथले जगणे  आयुष्य भोगणे  होई साध्य
जन्म-मृत्यु चक्र  वाटेल हा खेळ  व्दंव्दापार मेळ  जाणवेल
हळू हळू पूर्ण  होईल जीवन  स्थिरावेल मन  एकत्त्वात
हीच आत्मस्थिती  हेच अमृतत्त्व  विद्येमुळे प्राप्त होत असे !
***


अंधं तमः प्रविशन्ति ये असंभुतिम् उपासते
ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यां रताः ॥१२॥

जे कोणी भजती  असंभूति फक्त  घोर अंधारात  जातात ते
त्याहुनही घोर  अंधारात जाती  संभूतीच्या नादी  लागती जे ॥१२॥


विद्या नि अविद्या  दोन्हींच्या आधारे  जगायचे कसे  सांगितले
वेगळ्या भाषेत  पुन्हा बिंबवले  मर्म हाती दिले  सार्थकाचे

आधी आवाहन  केले विवेकाला  आता हृदयाला  दिली साद
आधी आपेक्षिला  बदल बुद्धीत  मग वर्तनात  अपेक्षिला

असंभूति आणि  संभूतिचा अर्थ  केला भिन्न भिन्न  जाणत्यांनी
व्यक्त नि अव्यक्त  जन्म नि अजन्म  सूप्त प्रकृति अन्  कार्यब्रह्म
निरोध – विकास  प्रवृत्ती – निवृत्ती  समाज नि व्यक्ती  इत्यादिक

दर्शनबिंदू हे  वेगवेगळाले  मर्म सार्‍यातले  नाही भिन्न
व्दंव्दांनी व्यापले  इथले जगणे  बाजू दोन नाणे  एक आहे
एकांगी नसावा  दृष्टीकोन, कृती  त्याने अधोगती  ठरलेली

नाही हितकर  केवळ प्रवृत्ती  केवळ निवृत्ती विनाशक
घोर अंधारात  जाती निरोधाने  फक्त विकासाने  अधिकच
व्यक्तिचा विकास  केवळ, अपुरा  समाजाची धुरा  कोण वाही?
व्यक्त विश्वातच  गुंततो जो कोणी  श्रेय त्याच्या हाती  येत नाही

पण अव्यक्तात  रमलेला भक्त  तोही पोकळीत  हरवतो
एकांगी विचार  अंधारात नेतो  अधोगती देतो  ओंजळीत
एकात रमता  घोर अंधःकार  अधिकच घोर  दुजामुळे
***


अन्यदेवाहुः संभवात् अन्यत् आहुः असंभवात्‍
इति शुश्रुम धीराणां ये नस् तद्‍ विचचक्षिरे ॥१३॥


वेगळेच फळ  जसे संभवाचे  तसे असंभवाचे  म्हणतात
घडविले आम्हा  ज्यांनी हे दर्शन  त्यांच्याच कडून  ऐकतो हे ॥१३॥


जन्माने लाभती  रूप गुण सारे  व्यक्तित्व लाभते  जीवनाला
वैविध्य सृष्टीचे  भोगताही येते  जाणताही येते  पल्याडचे 
अजन्मात असे  समस्थिती नित्य  जाणीव-स्वरूप  अनादित्व

प्रवृत्तीने ऊर्जा  मिळे जगण्याला  निवृत्ती मनाला  नेई आत
अंतर्मुख होता  कळती उणीवा  व्यक्तित्व विकासा  देती हात
पण समाजाचे  पाहायचे हित  तर बहिर्मुख  व्हावे लागे
व्यक्तीधर्म साधे  हित व्यक्तित्वाचे  समाजधर्माने  समाजाचे
कळे ऐलतीर  व्यक्तात रमता  अव्यक्त पूजता  कळे पैल

लौकिक प्रगती  होई विकासाने  साधे निरोधाने  संतुलन
विविध विचार  अंगे जीवनाची  शक्ती जगण्याची  वाढविती
एकामधे असे  वेगळी प्रेरणा  दुजाची प्रेरणा  वेगळीच
वेगळेच फळ  मिळे एकामुळे  मिळे दुजामुळे  वेगळेच

ऐकतो हे आम्ही  सांगती जे ‘संत’  कुणी प्रज्ञावंत  पुन्हा पुन्हा
शब्दातीत असे  प्राचीन दर्शन  तेच शब्दातून  घडविती
स्पष्ट सांगतात  विशद करून  विवेकाचे ज्ञान  हाती देती !
***


संभुतिं च विनाशं च यस् तद्‍ वेदोभयं सह ।
विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्या अमृतमश्नुते ॥१४॥

संभूति-विनाश  दोन्ही एकत्रित  जाणूनिया हित  साधतो जो ।
विनाशाने मृत्यु  ओलांडून जाई  अमृत मिळवी  संभूतिने ॥१४॥


उत्पत्ती विनाश  नाहीत अलग  एकातून एक  निघतात
जाणता न येते  उत्पत्ती केवळ  विनाशाचा खेळ  अटळच
कधीचे दोन्हीही  असंख्य रूपात  इथे नांदतात  एकत्रित
सारखेच आहे  महत्त्व दोन्हीचे  हित साधायचे  जाणून हे

प्रवृत्तीने नको  उदंड उल्हास  नुसता हव्यास  जगण्याचा
निवृत्तिची ओढ  करेल विन्मुख  कर्तव्याचे  भान हरवेल
प्रवृत्तीला हवी  निवृत्तीची साथ  निवृत्तीला साद  प्रवृत्तीची
प्रवृत्ती निवृत्ती  दोन्हीचा सुमेळ  जगण्याचा खेळ  रंगवतो

हारजीत दोन्ही  समान करून  अतीताचे भान  जागवतो
व्यक्ती समाजाचे  साधायचे हित  घालूनिया हात  हातामध्ये
विकास – निरोध  व्यक्त –अव्यक्तात  आहे अभिप्रेत  समन्वय
योग्य संतुलन  दोन्हीचे साधता  लाभेल सार्थता  जगण्याला

व्यक्ताने मृत्युला  येई ओलांडता  मिळे अमृतता  अव्यक्ताने
प्रवृत्तीने साध्य  हित ऐहिकाचे  पारलौकिकाचे  निवृत्तीने
समन्वयातून  साध्य होते दोन्ही  मत्युनाश आणि  अमृतत्त्व

उत्पत्ती विनाश  वाटेल हा खेळ  द्वंद्वापार मेळ  जाणवेल
हळू हळू मन  निःशंक होईल  आणि स्थिरावेल  एकत्वात
हीच आत्मस्थिती  हेच अमृतत्त्व  ऐक्यामुळे प्राप्त  होत असे!
***


ईशावास्य : मंत्र १५ ते १८

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपिहितम् मुखम् ।
तत् त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥

सत्याचे स्वरूप  सोन्याच्या पात्राने  आहे झाकलेले  सूर्यदेवा ।
उघडे कर ते  दिसावे म्हणून  सत्यउपासक  माझ्यासाठी ॥१५॥


आदि अंत ज्याला  असे विश्वरूप  घेऊन स्वरूप  झाकतोस
उधळून तेज  दावतोस जे जे  उपजे विनाशे  असेच ते
पण हे सारेच  इतके मोहक  तिथेच ‘दर्शन’  थबकते

झाकलेले आहे  प्रवेशाचे द्वार  पहावया आत  व्याकूळ मी
उघड सत्वर  सोन्याचे ते दार  सत्यउपासक  माझ्यासाठी
पंचेंद्रिये घेती  नित्य अनुभव  साक्षात समोर  आहे त्याचा

सत्य त्याच्या खाली  सत्य त्याच्या आत  बाहेरही सत्य  असे जरी
असंख्य रूपांनी  मन भांबावते  किरण वेगळे  वाटतात
जिव्हा रसामध्ये  घ्राण गंधामध्ये  दृष्टी दृश्यामध्ये  अडकते
तुझाच हा खेळ  तुझीच ही रूपे  जरी आकळते  बुद्धीला हे
तरी जगताना  कसा येत नाही  अनुभव काही  कळे त्याचा?

ज्ञानाची प्रचिती  होता शब्दांकित  सत्य त्याच्या आत  लपते का?
शब्द ना बांधती  प्रचितीला आत  गळूनिया रिक्त  होतात ते
ज्ञानाचे भांडार  पूर्ण रिते केले  झोळीत घेतले  पूर्ण ज्ञान
पण फाटलेली  आहे काय झोळी  ओंजळ मोकळी  होते कशी?

भुंगा होऊन का  अडकते मन  फुलांच्या कोषात  मोहकशा?
सोडव ही मिठी  घुसमटे प्राण  सत्याचे दर्शन  हवे आहे
सत्याचा मी भक्त  सत्याला पूजतो  शरण मी जातो  सत्यालाच
तरी काही सुद्धा  अनुभवा न ये  तूच आता स्वये  दाव काही
विश्वरूपाचा या  काढ मुखवटा  चेहरा गोमटा  दिसूदे ना !
***


पूषन्नेकऋषे यम सूर्य प्राजापत्य व्युह रश्मीन् समूह
तेजो यत्‍ ते रूपं कल्याणतमं तत् ते पश्यामि
यो S सावसौ पुरुषः सो S हमस्मि ॥१६॥


पुषन्‍ एकर्षे  प्रजापतीपुत्रा  यम आणि सूर्या  ईशरूपा
पोषणादी पाच  तत्त्वांची किरणे  पसरून मागे  पुन्हा घे तू
सर्वांना अत्यंत  कल्याणकारक  असे तुझे रूप  पाहतो मी
जो हा मी पाहतो  असा हा पुरूष  जो की जगदीश  तो मी आहे ॥१६॥


निर्मून विश्वाला  तूच पोसतोस  तूच पाहतोस  सर्वकाही
गती तुझ्यामुळे  तुझे नियंत्रण  बदलाची वीण  तुझ्यामुळे
तूच या विश्वाचा  धारक मारक  नियंता पालक  तूच होशी

तुझ्याच शक्तींचे  किरण हे पाच  ठेव पसरून  विश्वासाठी
असीम तेजाची  आकळेल व्याप्ती  पण त्याची दीप्ती  दीपवेल
मग आवरून  घे तू तुझे तेज  खेळ चालूदेत  अविरत

सार्‍याच्या पल्याड  तुझे रूप आहे  कल्याणतम जे  पाहतो मी
आता हे जे रूप  पाहतो निश्चिंत  तेच सदोदित  दिसे मज
तेच वसतसे  देहाच्या गावात  नित्य शुद्ध तत्त्व  असे जे की
‘पुरूष’ असा जो  दिगंतापल्याड  तोच हा अल्याड  देहामध्ये
आली ही प्रचिती  आला अनुभव  दृढ झाला भाव  तो मी आहे !
***


वायुरनिलम् अमृतम् अथेदं भस्मान्तं शरीरम् ।
ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर ॥१७॥


प्राण, अनिल हे  असती अमृत  परंतू शरीर  नष्ट होते
ॐ हे संकल्पा  केलेले आठव  केलेले आठव  सर्व काही ॥१७॥


शारीर मापाचा  प्राण शरीरात  तोच ब्रह्मांडात  भरलेला
सारे अंतरिक्ष  व्यापणारा प्राण  अनिल हे नाव  आहे त्याला
निर्माण जे होते  त्याला आहे अंत  जन्म-मृत्यु चक्र  चालू राही
देहही तसाच  विनाश होणारा  विलीन होणारा  पंचतत्त्वी

प्रार्थना पावली  घडले दर्शन  कृतार्थ जीवन  होय आता
‘तो मी आहे’ याची  प्रचितीही आली  आस पुरी झाली  प्रयत्नांती
आता प्राण होवो  लुप्त अनिलात  जावो ओलांडून  देहसीमा
मग देह जावो  त्याची राख होवो  काही मागे नुरो  माझे असे !

अर्पायचे सारे  त्यासाठी आठव  संकल्पा आठव  सर्व काही
आठव संकल्पा  निश्चय केलेले  दृढ धरलेले  ध्येय मनी

घ्यायचा आढावा  त्यासाठी आठव  संकल्पा आठव  काय केले
आठव संकल्पा  कसे जगलास  किती भोगलेस  धन-ऋण
आठव संकल्पा  काय काय केले  काय सवे आले  इथवर
आठव संकल्पा  मिळालेले ज्ञान  एकत्वाची जाण  आली होती

आठव संकल्पा  त्याचेच केलेले  ज्याने व्यापलेले  सर्वकाही
आठव असे की  तोच आहे एक  दिसे जे अनेक  तोच आहे
आठव इतके  विसर न व्हावा  तोच आठवावा  अंतकाळी
आठव इतके  दृढ होवो भाव  एकत्वाचा ठाव  हाती लागो !
***


अग्ने नय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानी विद्वान् ।
युयोधि अस्मत् जुहूराणमेनो भूयिष्ठां ते नम-उक्तिं विधेम ॥१८॥


हे अग्नी आम्हाला  ने तू सन्मार्गाने  धन मिळवणे  सार्थ कर
जाणतोस सर्व  विश्वातील तत्त्वे  ज्यामुळे घडले  आहे ते ते
वाकडे जाणारे  बाहेरचे पाप  आमच्यापासून  दूर ठेव
तुला आम्ही सर्व  नमस्कार करू  तुझे नाम घेऊ  पुन्हा पुन्हा ॥१८॥


‘असणे’च जेव्हा  प्राकाशित होते  अग्नीरूप घेते  मूलतत्त्व
विश्वरूपाने या  स्वतः प्रकटते  स्वतःला जाणते  अंतर्बाह्य
असशी विद्वान  ज्ञान-स्वरूप तू  असण्याचे ऋतू  निर्मितोस
दावितोस आम्हा  अनंत रूपात  सृष्टीचे विभ्रम  ओतप्रोत

इंद्रिये भोगती  समोर जे येते  आणि सुखावते  क्षणकाल
पण मन बुद्धी  दूर न पाहते  त्यातच गुंतते  पुन्हा पुन्हा
जिव्हारी लागूदे  रिक्तपण त्याचे  नव्या समृद्धीचे  भान येवो
दाखव सन्मार्ग  लाभूदे वैभव  आतले आर्जव  जागे होवो

जगण्यात खरी  येऊदे समृद्धी  आणि मन बुद्धी  स्थिर होवो
सभोती कित्येक  बांधणारे पाश  त्यातून विनाश  ओढवतो
वाकड्या वाटेने  नेणारे ते पाप  आमच्यापासून  दूर ठेव

आम्ही नम्रतेने  तुला विनवतो  आर्जव करतो  पुन्हा पुन्हा
व्याकूळ होऊन  अहंता सोडून  करू नमस्कार  लीनतेने
तुलाच विनवू  तुला मनी धरू  तुझे नाम घेऊ  पुन्हा पुन्हा

नाम घेता घेता  स्वरूप कळेल  अहंता गळेल  आपोआप
मग आतूनच  प्रचिती उगेल  शब्द फुटतील  सहजची
ईशावास्य सारे  हे जे आहे ते ते  जग जगातले  ईशावास्य !
***


ईशावास्य : शांतिमंत्र

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः

तेही पूर्ण आहे  हेही पूर्ण आहे  पूर्णात उगवे  तेही पूर्ण
पूर्णाचे संपूर्ण  काढून घेतले  तरी उरतसे  पूर्णच ते ॥
ॐ शांतिः शांतिः शंतिः


‘पूर्ण इथे नाही  फक्त विशेषण  भाषेतली वीण  साधणारे
पूर्ण ते आहे की  असते जे नित्य  आणि जे सर्वत्र  असतेच
काल, अवकाश  व्यापून असते  उणे काय व्हावे  कशातून?

त्यतूनच जन्मे  विलीन त्यामध्ये  नाम-रूपामध्ये  प्रकटे जे
पूर्णाहून काही  नाहीच वेगळे  जरी प्रकटते  भिन्नपणे
पूर्णाच्या क्षितिजी  उगवे ते पूर्ण  मावळते पूर्ण  पूर्णामध्ये

बीजातून एक  वृक्ष उगवतो  बीजे वागवतो  फांद्यांवर
बीजांमधे पुन्हा  असतात वृक्ष  वृक्षांवर लक्ष  बीजे पुन्हा
एक पूर्ण पेशी  निर्माण करून  मूळ पेशी पूर्ण  उरतसे

तसे ‘ते’ जगाला  जन्माला घालून  राहतसे पूर्ण  आहे तसे !
येणारे जाणारे  जगही ते पूर्ण  जन्मे ज्याच्यातून  त्याच्यासम
तेच प्रकटते  अनेक होऊन  कुठे उणेपण  काही नाही

कुणी त्यास म्हणे  ब्रह्म निराकार  कुणी त्या ॐकार  मानतसे
कुणी म्हणे ‘ताओ’  कुणी म्हणे ‘क्षेत्र’  सतत सर्वत्र  असणारे
कुणी म्हणे शून्य  सूक्ष्मतेचा अंत  स्थूळाचा आरंभ  असे ज्यात
पोकळ वर्तुळ  शून्याची ही खूण  शून्य हे प्रतिक  पूर्णाचेच

मूळ स्वरूपाचे  असे आकलन  होते तेव्हा मन  शांत होई
ध्यानस्थ मौनाला  स्पर्शता पूर्णत्व  जाणवे ईशत्व  सर्व ठायी !

ॐ शांतिः शांतिः शंतिः

 ईशावस्यम् इदं सर्वम्... ईशावस्यम् इदं सर्वम्...!!


(पुस्तकात प्रत्येक मंत्रापूर्वी संस्कृत मंत्राचा अन्वय, त्यातील प्रत्येक शब्दाचे व्याकरण व अर्थ आणि पद्यरूपांतरातील महत्त्वाच्या शब्दांचे स्पष्टीकरण टीपास्वरूपात पद्यरूपांतरानंतर दिले आहे)