Tuesday 24 May 2016

पसायदान


‘पसायदान’ ही संत ज्ञानेश्वरांनी केलेली एक श्रेष्ठतम अशी प्रार्थना आहे. गीतेवरील विस्तृत भाष्य असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या आठराव्या अध्यायात समारोप स्वरूपात ती आलेली आहे. त्यामुळे या प्रार्थनेची सुरुवात ‘आता’ अशी केलेली आहे. या प्रार्थनेचं वैशिष्ट्य हे की ती ईशस्वरूप विश्वात्मक देवाला संबोधून संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी केलेली आहे..!
पद्यरूपांतरामधे फक्त भावार्थ देण्याचा प्रयत्न आहे.
***

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्‍यज्ञें तोषावें
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥१७९३/१८

थोर गीताधर्म । साद्यंत कथिला
यथासांग झाला । शब्द-यज्ञ॥
विश्वात्मक देवा । प्रसन्न होऊन
द्यावे मज दान । हेची आता॥
*

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें॥१७९४/१८

कुटील बुद्धीचा । होऊदे विनाश
सत्कार्याची आस । लागो जीवां॥
सृष्टी नि माणसे, । सर्व प्राणिमात्र
यांच्यामध्ये मैत्र । उपजूदे॥
*

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात॥१७९५/१८

पापांचा अंधार । मावळून जावा
सूर्य उगवावा । स्वधर्माचा॥
चालतात जे जे । स्वधर्माच्या वाटे
त्यांना हवे ते ते । प्राप्त होवो॥
*

वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां॥१७९६/१८

ईश्वराचे भक्त । सार्‍या विश्वावर
करीती वर्षाव । मांगल्याचा॥
साधुसंत असे । सार्‍यांना भेटोत
निरंतर येथ । पृथ्वीवर॥
*

चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गांव
बोलते जे अर्णव । पीयूषाचे॥१७९७/१८

चालते बोलते । कल्पतरू आणि
गाव चिंतामणी । असती ते॥
बोलणे तयांचे । इतुके मधूर
जणू की सागर । अमृताचा॥
*

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु॥१७९८/१८

असती जे चंद्र । कलंकरहीत
सूर्य तापहीन । असती जे
संत सज्जन ते । सोयरे व्हावेत
नित्य लाभावेत । सकलांना
*

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित॥१७९९/१८

त्रैलोक्य सुखांनी । भरून राहावे
अखंड भजावे । ईश्वराला॥
*

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी॥१८००/१८

लौकिक जगी या । जगणेच ज्यांचे
ग्रंथमय झाले । अंतर्बाह्य
ईह-पर-लोक । दोन्ही स्तरांवर
विजयाचे घर । लाभो त्यांना
*

येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला॥१८०१/१८

लाभेल प्रसाद । म्हणे विश्वेश्वर
तेणे ज्ञानेश्वर । तृप्त झाला॥
***



पद्यरूपांतर - आसावरी काकडे